मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन हा दावा दाखल केला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्या यांनी या आरोपाचे खंडन करीत संजय राऊत यांनी माफी मागावी, असे म्हटले होते. संजय राऊत यांनी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. सध्या तरी संजय राऊत यांनी या मुद्द्यावर माफी मागितलेली नाही. याआधी मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आज पुन्हा मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून, राऊतांविरोधात १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
Medha Kirit Somaiya filed Rs100 Crore Defamation Suit against Shivsena Sanjay Raut today Mumbai High Court.
मेधा किरीट सोमैयानी आज मुंबई उच्च न्यायालय येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 100 कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला @BJP4India pic.twitter.com/UFlwVIwxz1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 23, 2022
यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सोमय्या म्हणाले, १०० कोटींचा शौचालय घोटाळा काय असतो हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समजेल. खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रवक्ते असून त्यांनी माफी कशी मागावी याची तयार करावी. कारण मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आता त्यांना किती शिक्षा होणार हे न्यायालय ठरवणार आहे. आम्हाला एक पैसा नकोय. ते सर्व धर्मादाय संस्थांना द्यावा; पण महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची माफी हवी आहे. एकदा तरी उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पापाचे फळ इथेच मिळेल, असे किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला केवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची माफी हवी आहे. त्यांनी माफियागिरी करून अनेक भ्रष्टाचार केले आहेत. एका नेव्ही ऑफिसरला मारहाण, मनसुख हिरेनची हत्या, हिरामणीचे त्याच्या परिवारासमोर मुंडण करणे, अशी दादागिरी त्यांच्या गुडांनी केली आहे. लोकांना धमक्या देणे, जीवे मारण्याचे काम करणे या सगळ्यामुळे एकदा तरी यांना धडा शिकवायचा होता. आम्ही संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आता न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. यासंदर्भातील याचिका वकील अमित शहा यांनी न्यायालयात दाखल केली असून जून महिन्यात यावर सुनावणी सुरू होईल, असेही सोमय्यांनी सांगितले.