हिंदू सणांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर सर्वात मोठा सण येते तो म्हणजे दिवाळी. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जातात. यावेळी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. तर पाडवा आणि भाऊबीज देखील एकाच दिवशी आले आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा उद्या पहिलाच दिवस आहे. सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला तोरण लावून दिवाळी पहाटची सुरुवात होते.
यंदा दिवाळीचा सण आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनावेळी देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणेशाची पूजा केली जाते. तसेच घरात सुखशांती, समृद्धी कायम रहावी यासाठी प्रार्थना ही केली जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
उद्याच्या दिवशी घराबाहेर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर दिव्यांची आरास केली जाते. कंदील, विद्युत रोषणाई यामुळे सारा परिसर प्रकाशमय होतो. फटाक्यांची आतिषबाजी होते. मिठाई, फराळ यांची मेजवानी असते. सगळीकडे उत्सहाचं वातावरण असतं.
दिवाळी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
हिंदु पंचागानुसार, २४ ऑक्टोबर २०२२ रोजी, संध्याकाळी ०७:०२ते ०८.२३ पर्यंत, प्रदोष काल म्हणजेच संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.
प्रदोष काळ – ०५:५० pm – ०८:२३ pm
वृषभ काळ – ०७:०२p.m. – ०८:५८ p.m.
लक्ष्मीपूजन नेमकं कसं करावं
लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करावयाचे आहे तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तबकात घेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावं. त्यानंतर या दोन्ही मूर्ती स्वच्छ धुवून-पुसून मुख्य स्थानी विराजमान कराव्यात तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी.