लालपरीचा प्रवास महागला; ऐन दिवाळीत प्रवाशांवर पडणार बोजा

मुंबई : दिवाळीत ‘बजेट’ ठरवून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक नियोजन थोडे कोलमडणार आहे. साधी बस ते शिवशाही अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यांच्या तिकीटदरांमध्ये सरसकट १० टक्के वाढ करण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे.

एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाढ केवळ दहा दिवसांसाठी आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल 
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे  त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि  विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ही दरवाढ २० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. एसटीने ५ ते ७४ रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Share