औरंगाबाद : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतरावरुन गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण सुरु आहे. आता ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. याच सभेत नामांतराची घोषणा मुख्यमंत्री करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच संदर्भात शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी माहिती दिली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील असेही खैरे म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या भाषणात सांगितले की, हो आम्ही म्हणतोच संभाजीनगर आणि आहेच संभाजीनगर. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच ८ मे १९८८ रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे. म्हणून आपण संभाजीनगर म्हणतो, पण काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला अधिकृतरीत्या कधी करणार. मात्र उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली असून, ते कधीपण जाहीर करतील असं खैरे म्हणाले.
नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत…
औरंगाबाद जिल्ह्याच नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे यांची ८ जूनला शहरातील मराठवाडा सांस्कृतीत मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आतातरी शहराचे नाव बदलणार का ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सुद्धा याच मुद्याला पुन्हा हात घालण्याची शक्यता आहे. तसेच सभेपूर्वी शिवसेनेकडून एक ट्रेलर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. त्यात सुद्धा नामांतराचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. त्यात आता खैरेंनी केलेला दावा पाहता उद्धव ठाकरेंच्या सभेत पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.