कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा; पुणतांब्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अखेर आज चौथ्या दिवशी सकारात्मक तोडगा निघाला आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज पुणतांब्यात येऊन आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. मंत्री दादा भुसे यांच्याशी तीन तास चर्चा झाल्यानंतर धरणे आंदोलनाला बसलेल्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी तूर्त दोन दिवसांसाठी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या आठवड्यात पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा आयोजित करून एकूण १६ ठराव मंजूर केले होते. ग्रामसभेतील निर्णयाची प्रत आणि आंदोलनाचा इशारा देणारे पत्र सरकारला पाठविण्यात आले होते. मात्र, सरकारकडून पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी कोणताही संपर्क करण्यात आला नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे कांदा, दूध, ऊस आदी पिकांना हमी भाव अशा विविध मागण्यांसाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

२०१७ साली पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभर पसरली होती. केवळ राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्रालाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात आला. या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे यावेळी ठरले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी, ७ जूनला ही बैठक होणार आहे. यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हा तोडगा आंदोलक शेतकऱ्यांनीही मान्य केला. मंगळवारची बैठक होईपर्यंत सध्या सुरू असलेले धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

कृषिमंत्री भुसे यावेळी म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. त्यावर चर्चा करून जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, ते लावले जातील. इतर प्रश्नांसाठी संबंधित यंत्रणा आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे, पुणतांबा येथील
सरपंच डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी भाग घेतला.

सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या सर्व विभागांशी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची मंगळवारी (७ जून) मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री भुसे यांनी दिले. या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेले आंदोलन तूर्त स्थगित केले असून, मंगळवारच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. धनवटे म्हणाले. कृषिमंत्री भुसे यांच्या विनंतीला मान देऊन दोन दिवसांसाठी आम्ही धरणे  आंदोलन तूर्त स्थगित करत आहोत. ७ जूनला आमची जी बैठक होईल आणि त्यानंतर जे निर्णय त्यांच्याकडून म्हणजे सरकारकडून येतील ते समाधानकारक वाटले तर ग्रामसभेत निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share