विधान परिषद निवडणुक; भाजपकडून ‘या’ पाच नावांवर शिक्कामोर्तब

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यातच जाहीर झाला आहे. २० जूनला १० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार यावरुन जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपकडून ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे, प्रसाद लाड यांना संधी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्राचे संघटन सचिव श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, राज्य भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड अशी नावे केंद्र भाजपने घोषित केले आहेत. या सर्व उमेदवारांची अर्ज आज आम्ही भरणार आहोत.

आमच्या पार्टीत आम्ही सर्व जण कोऱ्या पाकीटासारखे असतो. जो पत्ता लिहिल तिकडे जात असतो. राजकीय कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते पण निर्णय शेवटी संघटना करते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषदेच्या उमेदवारांचा निर्णय केंद्रातून होतो. पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले पण केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं, पंकजा ताई या ऑलरेडी ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत. मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र नंतर मध्यप्रदेश हे मोठं राज्य आहे आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

जसं आपण पाण्यातून एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर त्यामुळे निर्माण झालेला खड्डा पडतो तो अवघ्या काही सेकंदांत भरला जातो. तशाच प्रकारे नाराजी सुद्धा त्या पाण्यातील खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते. इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाहीये असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Share