‘अल-कायदा’ची भारतात आत्मघातकी हल्ल्यांची धमकी

नवी दिल्ली : भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. अल- कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा अल- कायदा द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने दिला आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असे या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी एका वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच भाजपचे दिल्लीचे माध्यमप्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी ट्विटरवर प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ती त्यांनी नंतर काढून टाकली. मात्र, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून मुस्लिम समुदायांनी जोरदार आक्षेप घेत निषेध केला. तसेच काही आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे ट्विटर ट्रेंडही पुढे आले. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपने रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले, तर दिल्लीचे माध्यमप्रमुख नवीनकुमार जिंदाल यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर अल- कायदा द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने एक पत्रक जारी केले आहे. भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार रहावे. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये, असा उल्लेख करत आत्मघाती हल्ला करणार, असा इशारा या संघटनेने या पत्रकातून दिला आहे.

जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात, आपण त्यांना ठार मारले पाहिजे. जे आपल्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:बरोबरच स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारे नाही, असेही या संघटनेने पत्रकात म्हटले आहे. या पत्रामध्ये भाजपच्या सत्तेचा उल्लेख ‘भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी’ असा करण्यात आला आहे. प्रेषितांच्या सन्मानासाठी या युद्धामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना, या युद्धात प्राण गमावले तरी हरकत नाही, असे या दहशतवादी संघटनेने इतरांना केले आहे.

Share