रेल्वे रुळावर अडकला पाय; महिला रेल्वेखाली गेली, पण लोकोपायलटच्या सतर्कतेने वाचले प्राण

औरंगाबाद : औरंगाबादमधील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक थरारक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर अचानक एक महिला आली. त्याचवेळी जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस समोरून आली. पण लोकोपायलटने प्रसंगावधान राखत वेळेवर रेल्वे थांबवली. त्यामुळे महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानकासमोर ही घटना घडली आहे. नियमित प्रमाणे जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याहुन औरंगाबाद रेल्वे स्थानकाकडे येत होती. जनशताब्दी एक्स्प्रेस ही ताशी १०० किमी वेगाने धावत होती. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे पोहोचली असता एक महिला रेल्वे ओलांडत असताना तिचा पाय रुळात अडकला आणि ती खाली पडली. ही बाब जनशताब्दीच्या मोटरमनच्या लक्षात आली. त्याने तातडीने हॉर्न वाजवून तिला बाजूला होण्याचा इशारा दिला. पण, गाडीचा वेग प्रचंड होता. तरीही चालकाने अत्यंत कौशल्याने रेल्वे नियंत्रणात आणून थांबविली आणि महिलेचा जीव वाचवला. ताशी १०० चा वेग असताना अवघ्या ५०० मीटर अंतरावरच गाडी थांबविण्यात मोटरमनला यश आले. मात्र, रेल्वे इंजिनसह चार डब्बे पुढे जाऊन रेल्वे थांबली होती. या महिलेच्या अंगावरून इंजिनसह ३ डब्बे गेले होते. पण, ही महिला सुखरूप होती. मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन महिलेला सुखरुप बाहेर काढले.

या घटनेमुळे जनशताब्दी एक्स्प्रेस १३ मिनिट घटनास्थळी थांबून राहिली. महिलेला रेल्वे खालून बाहेर काढल्यानंतर एक्स्प्रेस पुढे औरंगाबादकडे रवाना झाली. जनशताब्दी एक्सप्रेसचे मुख्य मोटरमन अमितसिंग, सहचालक धीरज थोरात यांची सतर्कता रेल्वे प्रशासनाने नोंद घेतली असून लवकरच सत्कार केला जाणार आहे.

Share