औरंगाबाद : औरंगाबाद शहर आता सर्वच नेत्यांसाठी राजकीय आखाडा बनले आहे. आधी मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा, त्यांनतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘जल आक्रोश मोर्चा‘ आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होत आहे. त्यातच आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सुद्धा जाहीर सभा होणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. सगळ्यांची सभा घेऊन झाल्यावर आमची सभा होईल. ही सभा म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार की’ अशी असणार आहे. असे जलील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी म्हणालो होतो सगळ्यांचं होऊ द्यात मग आमचं ‘सौ सुनार की एक लोहार की रेहेंगी‘, त्याचं होऊ द्या त्यांनतर आमची शंभर टक्के सभा होणार आहे. मात्र आम्हाला कुठे गावात फिरून लोकांसाठी गाड्यांची सोय करून द्यावी लागणार नाही. कुठेही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे सगळ्यांच्या सभा होऊ द्या त्यांनतर शेवटी आमची सभा होईल असं जलील म्हणाले. तर राज्यसभेच्या साहव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता जलील म्हणाले, याबाबत निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे घेतील. ६ जूनला ओवैसी नांदेडमध्ये असणार त्या ठिकाणी किंवा ७ जूनला त्यांची लातूर येथे सभा होणार असून, त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ असे जलील म्हणाले. निवडणूक लढवत असलेले सर्व लोकं संपर्कात असून, विनंती करत आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षातील कुणा आमदार किंवा खासदारांना नसून ते निर्णय फक्त असदुद्दीन ओवैसी यांना असल्याचे देखील जलील यावेळी म्हणाले.