मुंबई : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवेल आणि जिंकेलही, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्याच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु राज्यसभा निवडणुकीत पराभूत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो हे ध्यानात घ्यावे, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला. याचबरोबर, शिवसेना नेते परिवहनमंत्री अनिल परब या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख याच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली, हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणाकडून होणाच्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.