राऊतांप्रमाणे उद्या तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल – मनसे नेते संदीप देशपांडे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काल गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व गटप्रमुख, कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला. मात्र त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेना मेळाव्यातील राऊतांच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं की, “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा”, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. यापूर्वीदेखील अनेकदा संदीप देशपांडेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. आता शिवसेना देशपांडे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,दसऱ्या मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल  मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभुमीवर ‘गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है’ अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे.

Share