‘अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले’; भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच, यापुढे ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून मावळ्यांना, गोरगरीब समाजघटकांना एकत्र करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

संभाजीराजेंच्या या विधानावर आता भाजपानेही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

संभाजीराजे काय म्हणाले?
“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.

Share