मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्याची सूचना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
कर्नाटक विधीमंडळाचेही हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून मंगळवारी विधानसभेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यात आली. तेव्हा सीमावादाबाबतच्या राज्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणारा आणि या भूमिकेला ठाम पाठिंबा देणारा ठराव दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्याची सूचना खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, सीमावादाच्या मुद्द्यावर विधिमंडळाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आहे. महाराष्ट्राला राज्याची एक इंचही जमीन देणार नसल्याचं यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं की, जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करू असे बोम्मई म्हणाले.