विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना

नागपूर : विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये काल हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशना दरम्यान आमदार अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे काकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते. आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार अहिरे यांच्या हस्ते करावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सकाळी त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Share