छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ मध्ये झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारेनं नुकतंच यासंदर्भात निषेध व्यक्त केला होता. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाला प्राईम टाईम का मिळत नाही असा सवाल त्यानं उपस्थित केला. ‘मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार ? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे..,’ अशा शब्दांत अक्षयनं आपला राग व्यक्त केला होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील वेगवेगळे चित्रपट सध्या चर्चेत आले आहेत. या चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होतो. शिवअष्टक या चित्रमालिकेतील चौथं पुष्प शेर शिवराज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याला राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याची खंत अनेक सेलिब्रेटींनी व्यक्त केली आहे. याबाबत आता प्रत्येक कलाकार पुढे येऊन निषेध नोंदवत आहे.
आता प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळेनं एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी संतप्त होऊन आस्तादने ‘शेर शिवराज’ चित्रपटाला मिळलेल्या स्क्रिनिंग टाइमचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ‘अजून किती वर्षं “महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही” या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं?????’ अशा शब्दात आस्ताद व्यक्त झाला आहे. आस्ताद काळेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकही याचा गांभीर्याने विचार करताना दिसत आहे. नुकतेच एका प्रेक्षकानेही मराठी चित्रपटांना प्राईम टाइम देण्याची मागणी केली आहे.