उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरचा नागोबा! नारायण राणे यांची टीका

मुंबई : केंद्रीय लघु आणि सूक्ष्म खात्याचे मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा”, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या हिंदु्त्वाचा जोरदार समाचार घेत आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राज ठाकरेंनी आधी मराठी आणि आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण केले. आता त्यांनी पुन्हा नवा खेळ सुरू केला आहे. अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. कारण, असे खेळाडू कोणत्या मैदानांमध्ये कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवले आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखतीविषयी पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस.. ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:चा भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखं फार काही नाही”, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

“महाराष्ट्रदिनी राज्यातील जनतेला काय देणार ते बोलावं. गरिबी, निरक्षरता, रोजगार, दरडोई उत्पन्न यानर न बोलता उगीचच फुकटची बडबड. उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही. मुख्यमंत्रिपदावर ते शोभत नाहीत. त्यांनी महाराष्ट्र १० वर्षे पाठीमागे नेला”, अशी टीका राणे यांनी केली.

Share