दिल्लीमध्ये पुन्हा मास्कसक्ती, मास्क नसल्यास ५०० रुपये दंड

नवी दिल्ली : दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ही मास्क सक्ती असणार असून, नियम मोडणाऱ्यांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख चढता पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील केजरीवाल सरकारनं पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. काल दिवसभरात दिल्लीत २४९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ८५०६ वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा डेली पॉझिटिव्हीटी दर १५.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. अशातच, गेल्या २४ तासांत १४६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share