नागपुर : वेदांत फाॅक्सकाॅचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हाता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
शिवसेना नेते व राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी तळेगाव येथे वेदांत फाॅक्सकान विषयावरून केलेले आंदोलन हा खोटारडेपणा होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद करावीत. अन्यथा ते जेथे आंदोलन करतील येथे जाऊन आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
वेदांता प्रकल्पासाठी मविआ सरकारने MOU केला नव्हता, ना जमीन दिली होती. प्रकल्प गेल्यावरून जे लोक खोटारडे आंदोलन करीत आहेत, त्यांचा खोटारडेपणा उघड झाला. आता इव्हेंट मॅनेजमेंट बंद करून महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. #VedantaFoxconn pic.twitter.com/hwTZ8csgS7
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 26, 2022
वेदांता फाॅक्सनकाॅन कंपनीबाबत एमआयडीसीचे पत्र आपल्याकडे आहे. त्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, त्या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झालेला नाही आणि कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रार खोटारडेपणाची आहे. प्रत्यक्षात आघाडी सरकारने कंपनीशी करार केला नाही आणि जमीनही दिलेली नाही, हे आता उघड झालेले आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याचा हा पुरावा आहे. खोटारडेपणाबद्दल आघाडीच्या नेत्यांनी माफी मागवी, अशी मागणी बावनकुळेंनी केलीय.
दरम्यान, अतिवृष्टीचे संकट आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली आहे. ताबडतोब पंचनामे झाले. आता पूर्व विदर्भाला १९९९ कोटी रुपयांची मदत देण्याचा शासनाचा आदेश आला आहे. आपली अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना आतापर्यंत इतकी मोठी मदत कधीही मिळाली नाही. तसेच शिंदे फडणवीस सरकारने बुलेट ट्रेनच्या तत्परतेने काम केले आहे. आपण भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारचे आभार मानतो, असेही बावनकुळे म्हणाले.