मुंबईः मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत ५ जूनरोजीच्या अयोद्ध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, ३ मेरोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी राज्यभरात हनुमान चालिसा आणि महाआरतीचे आयोजन करावे, अशा सूचनाही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. बैठकीनंतर मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज, मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत अयोध्या दौरा आणि १मे रोजी औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच, आता ३ मे साठी मनसेनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ३ मे रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी राज्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांची परवानगी घेऊन ठिकठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. तसंच, महाआरतीदेखील करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंकडून महापूजेची सूचनाही देण्यात आली आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.