इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या  महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, वैचारिक बळ देऊन गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली.  “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’’ हा मूलमंत्र दिला.  त्यांच्या विचारांवर राज्य सरकार वाटचाल करीत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल. सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहील. राज्यात शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, शिष्यवृत्ती वाढविली जात आहे. सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Share