आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी वातावरण तापण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून (७ डिसेंबर) सुरु होत आहे. १७ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार १६ नवीन विधेयकं मांडणार आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी हे सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार आहेत. शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.

विरोधक सरकारला कोंडीत पकडणार
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवू शकतात. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

१७ दिवस चालणार अधिवेशन
संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान दोन्ही सभागृहांच्या एकूण १७ बैठका होणार आहेत. अधिवेशनात जास्तीत जास्त कामे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. २३ विधेयके मंजूर करण्याची सरकारची योजना आहे.

Share