विधान परिषद निवडणुकीत चमत्कार घडणार; भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार : मुनगंटीवार

नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच आता विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडणार आहे. विधान परिषद निवडणुकीत आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे सर्व पाचही उमेदवार नक्की विजयी होतील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ते आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यसभेच्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. भाजप नेत्यांच्या अचूक रणनीतीमुळे या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले. भाजपने विचारपूर्वकच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवार उभे केले होते. आमदारांच्या सद्सदविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी चोख नियोजन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतदेखील भाजपच विजयी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात त्यांचे काही चुकले नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करून भाजप आणि शिवसेना युतीला निवडून दिले. मात्र, शिवसेनेने आमच्याशी विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे आणि जे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरले असतील तेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Share