मनसे मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार – राज ठाकरे

कोल्हापूर :  मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की,पक्षाच्या स्थापनेपासूनचा अभ्यास केल्यास ९८ टक्के लोक आता मनसेत नवीन आहेत. मनसेही प्रस्थापितांविरोधात लढण्याची रणनीती करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तोही हालत असतो. मनसेने १९९५ आणि १९९९ साली अनेकांचे बालेकिल्ले हलवले होते. मुंबईतील जाहीर सभेत मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृतीची नव्हे तरी त्यांच्या प्रवृत्तीची चेष्टा केली होती. ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतरच सर्वांना भेटत आहेत. पदावर असताना का भेटत नव्हते, त्यावेळी आजारपणाचे कारण पुढे करून आता फुटलेल्या आमदारांनाही ते भेटले नव्हते, ही वस्तूस्थिती आहे.

सीमाप्रश्न आताच का?

सीमाप्रश्न अचानक कसा मधेच येतो. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीकडून आपलं लक्ष वळवायचं आहे का कोणाला? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावर दिल्लीत आता बैठकही झाली. त्यामुळे हा हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालय यावर निर्णय देईल. ते म्हणाले, मूळ बातमीपासून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे का? याचा शोध घ्यायला हवा. राज्यपालांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते अशा एका पदावर आहेत, म्हणून आपण सोडून देतो. या राजकारणात अशी काही लोक आहेत, ते जे काही पदांवर बसले आहेत. यातच असे अनेक माणसे आहेत, ज्याला पद मिळते, पोहोच येत नाही.

Share