पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन मोदींनी राज्य सरकारला सुनावलं; कर कमी करण्याच्या दिल्या सुचना

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधानांनी लसीकरण आणि खबरदारीबाबत चर्चा केली. याच बैठकीत मोदींनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून राज्यांना त्यांचा व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. गुजरात आणि कर्नाटकनं कर कमी करुन हजारो कोटींचं नुकसान सहन केलं आणि त्यांच्या शेजारच्या राज्यानं या काळात हजारो कोटी कमावल्याचा उल्लेख मोदींनी महाराष्ट्राचं नाव न घेता केला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केलं. राज्य सरकारांना देखील आवाहन करण्यात आलं काही राज्यांनी कर कमी केले तर काही राज्यांनी कर कमी केले नाहीत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकलं नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागलं. नोव्हेंबरमध्ये जे करायचं होतं ते काम केंद्राने केलं. आता वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, असं मोदी म्हणाले. गुजरात आणि कर्नाटक राज्यानं विक्रीकर कमी केल्याची माहिती देत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल किती किमतीला विकलं जात आहे, याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. यावेळी भाजप शासीत राज्यातील पेट्रोलचे दर नरेंद्र मोदींनी सांगितले.

Share