प्रियंका चोप्राही पडली ‘चंद्रमुखी’च्या प्रेमात…

बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायमच चर्चेत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. त्यावर भाष्य करणेही ती पसंत करते. मध्यंतरी सरोगसीच्या वादात ती अडकली होती. तर नुकतंच तिने तिच्या मुलीचे नामकरण केले. ‘मालती मेरी’ असे तिने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे. एरव्ही बॉलीवूड चित्रपटांवर भाष्य करणाऱ्या प्रियंकाने यंदा चक्क मराठी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

कॉमेडियन भारती सिंग पाठोपाठ आता बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही चंद्रमुखी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर चंद्रमुखी चित्रपटाचे एक पोस्टर तिने शेअर केले आहे. यासोबत तिने चंद्रमुखी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. ‘अभिनंदन आदिनाथ कोठारे. येत्या २९ एप्रिलला चंद्रमुखी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..’, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. तसेच अमृता खानविलकर आणि संपूर्ण टीमलाही तिने शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेला, प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपट अवघ्या काही दिवसातच आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यांची भुरळ अनेकांना पडली आहे. ‘चंद्रा’, ‘बाई गं’ या दोन लावण्या प्रसिद्ध झाल्या असून या गाण्यांवर थिरकण्यात चाहते दंग झाले आहेत. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सध्या बॉलीवूडमधूनही शुभेच्छा येऊ लागल्या आहेत.

Share