मुंबई : कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काॅग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनात अडचणीत असताना काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वत: ला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात अशी घणाघाती टीका काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जगात कोरोनाचे रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली होती तेव्हा राहूल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प करण्यास व्यस्त होते. आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मोदींच्या गुजरातमध्ये हे उत्तर भारतीय कामगार उपासमारीने त्रस्त असताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. आमच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस पक्षाने परप्रांतीय बांधवांची निवासाची जेवणाची व त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. संकटात असणा-या लोकांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला.
ज्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते लोकांची मदत करत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगून देशाची संपत्ती आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत होते. कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारे पाडण्यात व्यस्त असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नव्हता. गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करताना अनेक मजूरांचा मृत्यू झाला, काही बांधव रेल्वेखाली चिरडले गेले, त्यावेळी त्यांची मदत न करणारे, त्यांच्या मृत्यूबद्दल तोंडातून एक शब्द न काढणारे पंतप्रधान आज गरिबांची मदत केली म्हणून काँग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधानांचे हे वागणे म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असेच आहे, टोला प्रदेशाध्यक्षांनी लगावला.