लखनौ : आई पबजी गेम खेळू देत नव्हती म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने आईची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली. तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. साधना सिंह (वय ४० वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्यानंतर घरी अंडा करी मागवत मित्रांसोबत पार्टीही केली.
लखनौ येथील पीजीआय पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. तेव्हा खोलीत साधना सिंह या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ पिस्तुलही पडलेले होते. पोलिसांनी मृत साधना सिंह यांच्या १६ वर्षीय मुलाची चौकशी केली असता, घरात इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने आईची हत्या केल्याचे त्याने सांगितले. मृताच्या १० वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. मृत साधना हिचे पती लष्करात अधिकारी (जेसीओ) असून, ते सध्या पश्चिम बंगालमध्ये आसनसोल येथे कार्यरत आहेत. मृत साधना तिच्या १६ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांच्या मुलीसोबत पीजीआय परिसरात राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन लागले होते. आई साधना त्याला सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहण्यास सांगायची. रविवारीही साधना यांनी मुलाला मोबाईलवर पबजी गेम खेळल्याबद्दल खडसावले होते. त्यामुळे रागाच्या भरात मुलाने रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास साधना या झोपल्या असताना मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून आईवर गोळी झाडून तिचा खून केला. गोळीचा आवाज ऐकून आरोपी मुलाची बहीण धावत खोलीत आली. त्यानंतर त्याने बहिणीलाही दुसऱ्या खोलीत नेऊन धमकावले. आईच्या हत्येनंतर १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ऑनलाईन अंडा-करी ऑर्डर केली होती. तसेच मित्रांना घरी बोलवून पार्टीदेखील केली होती. मित्रांनी घरी आल्यानंतर त्याच्या आईविषयी विचारले तेव्हा आई काकीच्या घरी गेली आहे, असे त्याने सांगितले.
टीव्ही पाहून रचला आईच्या हत्येचा कट
टीव्हीवरील मालिका पाहून आरोपी मुलाने आईची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी मुलाचे वडील लष्करात अधिकारी आहेत. ते घरी आल्यानंतर त्यांची पिस्तूल साफ करत असत. पिस्तूल साफ करून झाल्यानंतर ते कपाटात ठेवत असत. मुलाला हे माहीत होते. तो कित्येक दिवसांपासून कपाटाची चावी शोधत होता. त्यानंतर त्याने एक खोटी चावी बनवून घेतली. आई कित्येक दिवसांपासून पबजी खेळण्यावरून त्याला रागवत होती. एके दिवशी आईने त्याच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतला होता. तेव्हा त्याने आपल्या आजोबांकडे आईची तक्रार केली होती. आजोबांच्या सांगण्यावरून आईने त्याला मोबाईल पुन्हा परत केला होता.
या घटनेनंतरही त्याने आईची हत्या करण्याचा कट रचला. आरोपी युट्यूबवरील व्हिडीओ पाहून गोळी चालवायला शिकला होता. रविवारी आईने पबजी खेळण्यापासून अडवल्याने त्याने त्या दिवशीच आईच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर त्याने घरातील कुत्र्याला बाहेर बांधले होते. तीन दिवस कुत्रा बाहेरच होता. आरोपीचे वडील घरी पोहोचल्यानंतर त्याने कुत्र्याला सोडले.
आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली. बुधवारी जेव्हा आरोपीचे वडील त्याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना अपेक्षा होती की, मुलगा त्यांना कडकडून मिठी मारुन शोक व्यक्त करेल किंवा त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला असेल. मात्र, तसे काहीच घडले नाही. वडील भेटायला आल्यानंतर त्याने आईच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. आई जेवायला देत नसे, भरपूर मारहाण करायची आणि वडीलही याकडे लक्ष देत नव्हते, असे आरोपीने यावेळी वडिलांना सांगितले.