“माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही”संभाजीराजेंच आमरण उपोषण आजपासून सुरु

मुंबई- मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आजपासून आझाद मैदानात आमरण उपोषणास सुुरुवात केली आहे.  काही दिवसांपूर्वीच संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजेनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे, असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा शुक्रवारी केली. यासंदर्भात विचारणा केली असता संभाजीराजे भोसले यांनी त्यावर निशाणा साधला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? हा प्रश्न आहे. फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य येता कामा नये. माझ्या माहितीनुसार हे कायदेशीर नाही, असं ते म्हणाले. तुम्ही या अर्थसंकल्पात आमच्या मागण्यांसदर्भात तरतूद करा. ब्लू प्रिंट दाखवा. आर्थिक नियोजन सांगा. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करा, असं देखील ते म्हणाले.

Share