पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एमपीएससीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर झाला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असं एमपीएससीनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/04UojRZ5s5 pic.twitter.com/ila1mnfVfV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 4, 2022
आयोगानं दिलेल्या पत्रकानुसार आता पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २१, २२ आणि २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आलं आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत विहित पध्दतीनं सादर करणं आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असं आयोगाच्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.