नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारची दणकेबाज एंट्री; नानांच्या नावाने सुरू केले प्रॉडक्शन हाऊस

मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपटांसह रंगभूमीवर आपल्या कसदार अभिनयाने स्वत:चा आगळावेगळा ठसा उमटविणारे अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांना ओळखले जाते. नाना पाटेकर यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाने म्हणजे मल्हार पाटेकरनेदेखील मनोरंजन क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय घेतला आहे. मल्हारने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस तयार केले असून, त्याला त्याने आपल्या वडिलांचे म्हणजे नाना पाटेकर यांचे नाव दिले आहे.

 

नाना पाटेकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून तसेच नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रस्थापित बॉलिवूड कलाकारांच्या तुलनेत सौंदर्याच्या, देखणेपणाच्या व्याख्येत न बसणारे नाना पाटेकर हे आपल्या चतुरस्त्र अभिनयाने कायमच त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. केवळ अभिनय, संवाद फेकीच्या जोरावर या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही तुफान आहे. नानांचा चित्रपट आवर्जून पाहणारा खास प्रेक्षकवर्ग आहे. नानांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकले ते क्षेत्र कायमच गाजवले. अगदी समाजसेवेतही ते मागे नाहीत. चित्रपटांशिवाय नाना पाटेकर हे सामाजिक कार्यातदेखील सतत सक्रिय असतात. नाना पाटेकर यांनी प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाऊंडेशन’ स्थापन केले आहे. मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील अन्य भागातील दुष्काळग्रस्त आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ‘नाम फाऊंडेशन’ मार्फत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी भरघोस मदत केली आहे. नानांच्या या कामाची खूप प्रशंसा झाली. आजही नाना पाटेकर सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.

नाना पाटेकर यांनी अभिनेत्री आणि बँक ऑफिसर नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला. त्यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. नानांच्या मुलाचा म्हणजे मल्हारचा नानांच्या चाहत्यांचा फारसा परिचय नाही. आता मल्हारनेही नानांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. आता मल्हारदेखील चित्रपटसृष्टीत काम करणार आहे; परंतु त्याचे हे काम नानांपेक्षा वेगळे असणार आहे. मल्हारने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस तयार केले आहे. खरे तर यापूर्वी नाना पाटेकर यांनी जेव्हा राम गोपाल वर्मा यांचा ‘२६/११’ नावाचा चित्रपट केला होता त्यावेळी त्या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मल्हारने जबाबदारी पार पाडली होती. २०१३ मध्ये ‘गॉडफादर’ या चित्रपटात त्याने लहानशी भूमिका साकारली होती. आता त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी होती. मात्र, नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यातील वादाचा फटका मल्हारला बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता एका नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मल्हार प्रेक्षकांसमोर येणार आहे. मल्हारने नाना पाटेकर यांच्या नावाने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस तयार केले आहे. ‘नानासाहेब प्रॉडक्शन हाऊस’ त्याचे नाव. सध्या मल्हार ‘नानासाहेब प्रॉडक्शन हाऊस’ मध्ये निर्मात्याची भूमिका साकारताना दिसत आहे.

मल्हार हा नाना पाटेकर यांची ‘सेम टू सेम कॉपी’ आहे, असे सांगितले जाते. मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने वाणिज्य (कॉमर्स) शाखेची पदवी संपादन केली आहे. मल्हार पाटेकरला पशुपक्ष्याबद्दल विशेष प्रेम. अनेकदा मुक्या प्राण्यांना, पक्ष्याना चारा-पाणी देताना तो दिसून येतो. फिरण्याची आवड असणारा मल्हार पक्का खवैय्याही आहे. मल्हार फिलांथ्रोपिस्ट असून, तो ‘नाम फाऊंडेशन’च्या कामातही हातभार लावतो. लहानपणापासून मल्हारला चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. ती त्याने जपली आहे. आता तो निर्मिती क्षेत्रातून पुढे येत आहे. नानांप्रमाणेच मल्हारदेखील या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

Share