राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, बावनकुळेंची टीका

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान २०० जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त कॉंग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद, शिवप्रतापगड उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. मतांच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो असंही बावनकुळे म्हणाले.
Share