शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; अंबादास दानवेंचं संजय गायकवाडांना प्रत्युत्तर

औरंगाबाद : बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. या इशाऱ्याला आता शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, “शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे. हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर या”, असे खुले आव्हान त्यांनी आमदार गायकवाडांना दिलं आहे. गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर येऊन बोलावं. मग त्यांना कळेल कोण चून चून के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल”, असा इशारा दानवेंनी गायकवाडांना दिला आहे.

काय म्हणाले होते संजय गायकवाड?
शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातला. यात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण पसरले होते.

या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असेही गायकवाड म्हणाले आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. शनिवारी झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हाच हिशोब चुकता केला असता, असेही गायकवाड म्हणाले आहेत. पुन्हा राडा केल्यास आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे.

Share