ईडीच्या तपासाबाबत राऊत साहेबच बोलू शकतील – अजित पवार

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज सकाळपासून ईडीचं पथक दाखल झालं आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची ईडीकडून पुन्हा पुन्हा का चौकशी केली जात आहे, याबाबत राऊत साहेबच बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. देशातील कोणत्याही नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार त्या यंत्रणांना असल्याचे पवार म्हणाले.

यासोबतच अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्या यंत्रणांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, त्या मग आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा या यंत्रणा का येतात त्या संदर्भात जास्त राऊत साहेब सांगतील. अजित पवार हे सध्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share