औरंगाबाद : वाहतूकीचे नियम पाळले नाही म्हणून वाहन चालकावर पोलीसांनी कारवाई केल्याच आपण नेहमीच बघतो. पण शहरात मात्र हे चित्र काहीस वेगळच दिसतय. जे वाहनचालक नियम पाळताय त्यांनाच पोलीस आयुक्तालयातून बोलावण येत आहे.
औरंगाबाद शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम पाळण्यासाठी अनेकदा नागरिकांना आवाहन केले जाते. मात्र तरीही मोठ्याप्रमाणात दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट वापरावे म्हणून औरंगाबाद शहर पोलिसांनी एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा असून, नागरीक आता हेल्मेट सुद्धा घालत आहे.
शहरातील प्रत्येक सिग्नलवर येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून फोटो काढले जातात. ज्यातील हेल्मेट घातलेल्या आणि शिस्तप्रिय अशा ३०० ते ३५० नागरिकांच्या फोटोंची निवड केली जाते. त्यानंतर यातील १० दुचाकीस्वारांची सोडत पद्धतीने निवड केली जाते. निवड झालेल्या दुचाकीस्वारांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून गिफ्ट देऊन त्यांचे सत्कार केले जाते. सोमवारी या उपक्रमाची पहिली सोडत झाली, ज्यात निवड झालेल्या १० दुचाकीस्वारांचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्यामुळे यापुढे तुम्ही देखील नियम पाळले तर तुमचाही सत्कार केला जाऊ शकतो.