पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही – फडणवीस

मुंबईः  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नवाब मलिक यांची अटक ते त्यांचे दाऊदशी असलेले संबंध यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच एसटी कामगारांच्या मागण्यांवरूनही ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. यावरून विरोधकांकडे सरकारविरोधातील भरपूर दारूगोळा असून उद्या होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सरकारची घेराबंदी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीच किंमत राहिलेली नाही. सगळा कारभार अनागोंदी सुरु आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे.
  • दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही.ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत.
  • नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार.
  • शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीतील अपूर्ण बाबी द्यायला लावणार.
  • विविध समाजांचे प्रश्न आहेत.छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिली.
  • भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे. लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे.
    याचा जाब सरकारला विचारू.
  • देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी……
  • तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
Share