जनतेचे महागाईशी युद्ध सुरु पण आमच्या पंतप्रधानांना रशिया-युक्रेनची चिंता, राऊतांचा केंद्राला टोला

नवी दिल्ली : देशात प्रचंड महागाई वाढलेली आहे. पण यावर कोणीही बोलत नाहीये. भोंग्यांचा मुद्दावर सगळेच बोलत आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्यात होतंय, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,  महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दा उठलाच नाही, माहौल खराब करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, पण त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात सर्वकाही ठिकठाक आहे, काही जणांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मांच्या लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हे देशात चालणार नाही. भोंग्यांसंदर्भात एक राष्ट्रीय धोरण तयार केले पाहिजे आणि ते संपूर्ण देशात लागू केले पाहिजे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय ज्यांनी काढला, त्यांच्यामुळे याचा सर्वात मोठा फटका हिंदू मंदिरांना बसला आहे. भजन-कीर्तन करणाऱ्यांना बसला आहे. यामुळे या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज कोण असेल तर तो हिंदू समाज आहे, असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्या देशाचे पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले, त्यांना युक्रेन रशिया युद्धाची चिंता आहे, त्यांचे भक्त वाहवा करत आहेत, पण इकडे सर्वसामान्य जनता महागाईशी युद्ध करत आहे. राऊतांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, महागाई-बेरोजगारी हे देशातील खरे मुद्दे आहेत, पण यावर एकतरी भाजपचा मंत्री, नेता बोलतोय का? ते भोंग्यावर बोलत आहेत. सरकार म्हणून तुम्ही अन्न-वस्त्र निवारा यावर बोलणं गरजेचं आहे, भोंग्यांवर बोलणं गरजेचं नाही. देशाचे पंतप्रधान महागाईवर बोलत नाहीत, अर्थमंत्री महागाईवर बोलत नाही, ना महाराष्ट्रातील भाजचे एखादे मोठे नेते यावर बोलत आहेत. त्यांचे मुद्दे वेगळेच आहेत. पंजाबचे पोलीस काय करतात, महाराष्ट्राचे पोलीस काय करतात याकडे यांचं लक्ष आहे. युक्रेन-रशिया हे देश त्यांचं पाहून घेतील, तुम्ही महागाईवर आधी बोला, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

Share