इंदोरमध्ये अग्नितांडव: ८ मजली इमारतीला आग, ७ जण जिवंत जळाले

इंदोर : इंदोरच्या विजय नगरमधील एका ८ मजली इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. आगीमुळे ७ जण जिवंत जळाले आहेत. मृतांमध्ये ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. काही समजण्याआधीच काही जण जळाले, तर काही जण गुदमरले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.  मिळालेल्या माहितीनुसार, खजराना रिंग रोडवरील स्वर्ण कॉलनीतील आठ मजली इमारतीला आग लागली. येथे १३ दुचाकी व एक चारचाकी वाहन जळाले आहे. इमारत इन्साद पटेल यांची आहे. येथे १० फ्लॅट होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीतून ९ जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीत भाजून ज्यांचा मृत्यू झाला ते या इमारतीत भाड्याने राहत होते. यातील काही लोक शिक्षणासाठी आले होते. तर काही जण जॉब करत होते. आगीने एवढं भीषण रूप धारण केलं की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. झोपेतून जागे झालेल्या लोकांना काही समजेल तोपर्यंत काही जण जिवंत जळून मेले, तर काही गुदमरून मरण पावले. पोलिसांनी मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Share