नेपाळमध्ये २२ प्रवाशांसह विमान बेपत्ता; ४ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळमधील पोखरा येथून जोमसोम येथे जाणाऱ्या एका प्रवासी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवासी होते. दोन तासांपासून हे विमान रडारवरून बेपत्ता झाले आहे. बेपत्ता झालेल्या विमानात ४ भारतीय नागरिकांसह दोन इतर परदेशी नागरिक आहेत, तर उर्वरित सर्व प्रवासी हे नेपाळ देशाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हे विमान कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळ प्रशासनाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने या बेपत्ता विमानाचा शोध सुरू आहे.

याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेल्या विमानाने रविवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन प्रभाकर घिमेरे हे आहेत. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान रडारवरून गायब झाले आहे. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. तसेच नेपाळ पोलिसांनीदेखील शोधमोहीम सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते विष्णू यांनी सांगितले की, २२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अचानक बेपत्ता झाले आहे. विमान बेपत्ता होऊन दोन तास झाले आहेत. अद्याप विमानाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शोध सुरू आहे. नेपाळी लष्कर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने विमानाचा शोध घेत आहे. नेपाळ पोलिसदेखील बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.”

या विमानामध्ये तीन क्रू सदस्य असून कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाइट अटेंडंट किस्मी थापा आणि अन्य क्रू मेंबर उत्सव पोखरेल अशी त्यांची नावे आहेत. उड्डाण केल्यानंतर २५ मिनिटांत हे विमान जोमसोमला पोहोचणे अपेक्षित होते; पण रडारवरून संपर्क तुटल्यानंतर दोन तासांपासून हे विमान बेपत्ता आहे. क्रूसह एकूण २२ प्रवासी या विमानात होते. या विमानाला शेवटचे मुस्तांग जिल्ह्यात पाहण्यात आले. त्यानंतर या विमानाने माउंट धौलागिरी येथे वळण घेतले. त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. मुख्य जिल्हाधिकारी नेत्र प्रसाद शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

या विमानाचा संपर्क तुटल्यानंतर प्रशासनाने तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. पोखरा ते मुस्तांगदरम्यान हे दोन हेलिकॉप्टर विमानाचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर नेपाळी सेना MI-17 हेलिकॉप्टरचाही बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जोमसॉम एअर ट्रॅफिक कंट्रोलरने घासा परिसरात एक जोरात आवाज ऐकल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या म्हणण्यानुसार, जिथून विमानाचा सिग्नल गायब झाला आहे त्याच क्षेत्रात या विमानाचा शोध घेण्यात येत आहे.

Share