पुणे : कोरेगाव भीमा परिसरात पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. ३०) विजयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.
पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे आदी या वेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचा विचार करता त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्यावतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व विभागाच्यावतीने नियोजनाप्रमाणे कामे करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. पोलीस विभागाच्यावतीने उत्तम पद्धतीने बंदोबस्त करण्यात येणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सुविधा निर्माण करण्यात येत असून जयस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. चारही बाजुंनी बॅरिकेट तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.