वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तातडीने सादर करा

नागपुर : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नाग, पिवळी, कन्हान व वैनगंगा नदी प्रदषणविषयक माहितीचे सादरीकरण केले.नागपुर महापालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सांडपाणी नाग, पिवळा व कन्हान नदीत सोडण्यात येते. या नद्यामधील दुषित पाणी तसेच भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेचे सांडपाणीही वैनगंगा नदीमध्ये येत असल्याने वैनगंगा नदीतील पाणी दुषित होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय यंत्रणांनी नद्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठीच्या लघू व दिर्घकालीन उपाययोजनांचे कृती आराखडे तातडीने सादर करावेत, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत उपाय

नागपूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा आढावा घेण्यात आला असून लघू व दिर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे नागपूरच्या जिल्हा जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबतच्या उपाययोजनांविषयीची माहिती जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी दिली. तसेच नागपूर महापालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रियेची सद्यस्थिती तसेच प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिली.

नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, उपायुक्त (गोसीखुर्द) आशा पठाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांच्यासह नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जलसंपदा विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Share