काॅंग्रेसला धक्का, कपिल सिब्बल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसच्या G-२३ गटाचा प्रमुख भाग असलेले कपिल सिब्बल यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तसंच, समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

कपिल सिब्बल यांनी आज लखनऊ येथून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सांगितले की, १६ मे रोजी मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सांगितले की, अपक्ष म्हणून ते पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या मदतीने उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर जात आहेत.

उदयपूर चिंतन शिबिराचे निमंत्रण

काँग्रेस पक्षाचे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिराचे निमंत्रण ही कपिल सिब्बल यांना देण्यात आले होते. मात्र, जी-२३चे बंडखोर कपिल सिब्बल तिथे गेले नाहीत. तेव्हापासून ते पक्ष सोडतील अशी चर्चा होती.

काँग्रेस नेत्रृत्वाला आव्हान

जी-२३ हा काँग्रेस पक्षाचा एक गट आहे. या नेत्यांनी गेल्यावर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्ष नेत्रृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर उपस्थित केले होते. संघटनेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी या नेत्यांनी केली होती. यामध्ये कपिल सिब्बल, गुलाम नवी आझाद यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा सहभाग होता.

Share