शरद पवार राजकारणातला बिलंदर माणूस; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

सांगली : बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. मला वाटते की, हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असा खोचक टोला माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून आटपाडी तालुक्यात बनपुरी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी शरद पवारांवर टीका करताना खोत म्हणाले, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. ब्राह्मण समाजाने आरक्षण मागितले नव्हते; पण शरद पवारांनी ट्विट केले की, दुसऱ्याच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका. मात्र, आम्ही असे म्हटलेच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. यातून पवारांचा खोटारडेपणा दिसून येतो. मी मेल्यावर बारामतीचा हा गडी इकडे कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे. हा गडी एवढा हुशार झालाच कसा? यांच्यामध्ये कोणते स्पेअरपार्ट घातले हेही ब्रह्मदेवाला विचारणार आहे. मला वाटते ब्रह्मदेवाला चुकवून ते खाली पळाले असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात शोधूनही सापडणार नाही. या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या मंडळींनी केले आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की, आपल्याला हे सरकार घालवायचे आहे, असे खोत म्हणाले.

हर्बल तंबाखू पेरण्याची परवानगी द्या
शेतकऱ्यांना हर्बल तंबाखू पेरण्याची परवानगी द्या, असे म्हणत खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला. यावर्षी हर्बल गांजा पेरायला हवा. कारण, हर्बल गांजाला परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडल्यानंतर तो हर्बल तंबाखू असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण एकमुखाने मागणी करूया की, हर्बल तंबाखूचे बियाणे द्या. त्यामुळे आमची गरिबी तरी जाईल. कारण तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही. जो कोणी बोलतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकले जाते, असेही खोत म्हणाले. पवारांमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आमच्या नादी लागू नका!
आमच्या नादाला कशाला लागत आहात? आम्ही फाटकी माणसं आहोत. आमचे काही जात नाही, आमच्या मागे-पुढे काही नाही. आमच्या नादी लागू नका. आम्ही आधीपासून नागडे आहोत; पण तुम्हाला चौकात नागडे केल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा, असाही इशारा खोत यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

खोत यांनी शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून मुख्यमंत्र्यांना त्यांनी टोला लगावला. भाजपने औरंगाबादेत काढलेल्या जल आक्रोश मोर्चामुळे महाविकास आघाडीला अडचण निर्माण झाल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सांभाळता येत नसल्याने पुन्हा देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचे आहे, असे खोत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आपल्याला खरे करायचे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे आहे. हे लोक फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र, शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे फडणवीस यांनी म्हटले होते, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचे समर्थन केले.

Share