बुसाननवर मात, स्वीस ओपन स्पर्धेत सिंधूला अजिंक्यपद

स्वीस-  भारताची स्टार बॅडमिंटपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी स्विस खुल्या स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूने चौथ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानला २१-१६, २१-८ अशी धूळ चारली. या स्पर्धेच्या गेल्या पर्वातील अंतिम सामन्यात सिंधूला स्पेनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरीनने पराभूत केले होते. यंदा मात्र दुसऱ्या मानांकित सिंधूने खेळ उंचावत जेतेपदाला गवसणी घातली. तिचा बुसाननवरील हा १७ सामन्यांतील १६वा विजय ठरला.

 

अंतिम सामन्यात सिंधूला पहिल्या गेममध्ये ३-० अशी आघाडी मिळाली होती . मात्र, बुसाननने पुनरागमन करताना ७-७ अशी बरोबरी साधली. बुसाननने सिंधूला नेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बऱ्याच चूकाही केल्या. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यांतराला सिंधूला ११-९ अशी आघाडी मिळाली. यानंतर सिंधूने दमदार खेळ करत पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने अप्रतिम खेळ सुरू ठेवत ५-० अशी आघाडी मिळवली. मग तिने बुसाननला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. अखेर तिने दुसरा गेम २१-८ असा मोठय़ा फरकाने जिंकत या स्पर्धेचे जेतेपद निश्चित केले.

Share