नवी दिल्लीः सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज क्वाड देशांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक व्हर्च्युअल असणार आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही यात सहभागी होणार आहेत.
क्वाड देशामध्ये होणाऱ्या बैठकीत भारताव्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानचे राष्ट्रपतीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत सामील होणार आहेत. या बैठकीत रशिया-युक्रेन मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केल्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळाली नसल्याचे परराष्ट्र मंत्र्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले. एका निवदेनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे,
क्वाड काय आहे
हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी आपत्ती निवारण प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अनौपचारिक युती तयार केली. साधारणपणे, क्वाड ही चार देशांची संघटना असते, त्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश होतो.