राज ठाकरेंमध्ये वर्णद्वेष, जातीवाद ठासुन भरला आहे – जितेंद्र आव्हाड

मुंबई : ठाण्यात काल झालेल्या सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेससह पक्षातील अनेकांवर जोरदार टिका केल्याच बघायला मिळालं. राज ठाकरे यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली होती. आव्हाड हे नागाच्या फण्यासारखा चेहरा करतात. आणि शेपटीला धरून गरागरा फिरवून फेकून देईल, असे राज ठाकरे काल म्हटले होते. त्यांच्या याच टिकेला जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिल आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राज ठाकरे तुम्ही कायम इतरांच्या चेहऱ्यावरून बोलता, इतरांच्या नाकावर जाता, रंगावरून त्यांना हिणवता. यावरून तुमच्यात वर्णद्वेष आणि जातीयवाद किती ठासून भरला आहे, हे दिसते, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एखाद्याच्या व्यंग किंवा रंगावरून कधीही टीका करायची नसते. उद्या आम्ही तुमच्या शारीरिक व्यंगांवर टीका केली तर ही गोष्ट तुम्हाला आवडेल का?, असा सवाल आव्हाड यांनी राज ठाकरे यांना विचारला. राजकारणात वैयक्तिक टीका करायची नसते. हे पाप आहे. इथे मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकत नाहीत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, देशातील मुस्लिमांना ते देशद्रोही आहेत की देशप्रेमी, हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणात हिडीसफिडीस बोलतात, इतरांची टिंगलटवाळी करतात. पण मग त्यांना पेट्रोल-डिझेल, गॅस आणि भाजीपाल्याचे वाढलेले भाव दिसत नाहीत का? त्यावर राज ठाकरे काहीच बोलत नाहीत. फक्त त्यांना मानणाऱ्या एका वर्गाला उजवीकडे नेण्यासाठी ते काहीपण बोलत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Share