मराठी भाषा गौरव दिना निमित्याने राज ठाकरेंचे कार्यकर्यांना पत्र

मुंबईः  सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्‍वतपण टिकवावे या हेतूने. जगभरात हा दिन जिथे मराठी माणूस निवास करतो तिथे साजरा होतो. आता यावक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्यांना मराठी भाषा गौरव दिन हा मोठ्या प्रमणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याबाबद राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी पत्र लिहित आहे की, २७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. ‘गौरव दिवस’. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.

हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केले होत. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता, असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.

ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा हा “गौरव” दिवस आहे . संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच ! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटल.

यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळले पाहिजे की आज “मराठी भाषा गौरव दिवस” आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचे पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

Share