मशिदीच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम; काय निर्णय घ्यायचा हे सरकारला माहीत आहे- संजय राऊत

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या उत्तर सभेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत. सरकारला भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना नेते संजय राऊतांनी राज ठाकरेंना तिरकस बोल लावत त्यांचा समाचार घेतला आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘राजकीय व्यासपीठांवरून अशा प्रकारच्या घोषणा होतच असतात. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे आणि काय निर्णय घ्यायचा हे सरकारला माहीत आहे. कोणीही येऊन काहीही बोलतं आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतं, त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी मनसेसह भाजपवरही जोरदार टीका केली आहे. रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये झालेली हिंसा ही केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठीची तयारी आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तसंच या देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले आहे.

किरीट सोमय्यांवरही साधला निशाणा…

‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. याविषयी राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मिळणं हा दिलासा घोटाळा आहे. कोर्टाने जरी त्यांना दिलासा दिला असला तरी त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. सोमय्या पिता-पुत्र तुरुंगात जाणारच,’ असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.

Share