महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असं मी मानतच नाही.शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे, असं माझं मत आहे, असा दावा करतानाच शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकत्रच आहे, असा दावाच राज ठाकरे यांनी केला आहे.

मी जेव्हा बोलतो आणि तुम्ही रिअॅक्ट होता. पण आपण जे करतोय ते लोकांपर्यंत जातंय. मी नाशिक आणि कल्याण डोंबविलीत गेलो होतो. तिथे अनेक माता भगिंनी मला भेटल्या. त्यांनी माझा हात पकडून, बाबा रे विश्वास तुझ्यावरच आहे, असं म्हटलं. विश्वास टिकवणं हे महत्त्वाचं आहे. त्याचीच आज शपथ घ्यायची आहे. बाकीच्यांनी विश्वास गमावला आहे. कोण कुठे आहे हे कळत नाही. कुणाचं नाव घेतलं तर तो कुठे आहे हे विचारावं लागतं, असं राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार आणि अजितदादा आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. त्या दिवशी नाट्यसंमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. पण कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. पण सर्व आले होते एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही सर्व आतून एकच आहेत.

महाराष्ट्राची माती होते. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं आहे, असं राज ठाकरे  म्हणाले.

वेगवेगळ्या जातीत राहावं. त्यासाठीचं विष कालवायला नेते बसलेलेच आहेत. मराठ्यांचं झाल्यावर ओबीसी उभं राहणार, त्यानंतर अजून कोणी उभे राहणार. आपल्याकडे महापुरुषांना जातीत वाटलेलं आहे. याच लोकांनी वाटलेलं आहे. तुमची जेवढी मते विभागली जातील तेवढं यांच्या फायद्याचं आहे. मराठी म्हणून एकत्र येणं देशाला आणि यांनाच नको. हे विष कालवण्याचे धंदे ओळखा, आज नोकऱ्यांचा विषय आहे. शिक्षणाचा आहे. बाहेरच्या राज्यातील लोकं पोसायची आणि आम्ही आंदोलनं करायची हेच सुरू आहे. इथल्या तरुणांना नोकऱ्या देणं या राज्याला सहज शक्य आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं राज्याला शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये, मराठी म्हणून एकत्र राहू नये, तो वेगवेगळा असावा. मराठी म्हणून एकत्र येणं देशाला आणि यांनाच नको. हे विष कालवण्याचे धंदे ओळखा, असं ते म्हणाले.

Share