राणा दाम्पत्या अन् राष्ट्रवादी एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण

नागपूरः   मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी घराबाहेर पडलेले राणा दाम्पत्य अर्थात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनी पुन्हा अमरावतीत परतणार आहे. दरम्यान त्याआधी ते नागपूरात रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. पोलिसांनी त्यांच्या या चालीसा पठणासाठी काही अटींसहित परवानगी दिली आहे. दरम्यान त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यतर्त्यांनी हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली आहे. त्यांनाही परवानगी दिली असून राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि राणा समर्थकांमध्ये आमनेसामने येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य ३६ दिवसांपूर्वी अमरावतीतून बाहेर पडले होते. तुरुंगवारीनंतर राणा दांम्पत्य पहिल्यांदा मतदार संघात येणार आहे. त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागताचे आयोजन केले आहे. युवा स्वाभिमान पार्टीकडून त्यांचे भव्य जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. दिल्लीहून विमानाने नागपुरात दाखल झाल्यावर राणा दाम्पत्य पहिल्यांदा हनुमान मंदिरात चालीसा पठण करणार आहे. तर राष्ट्रवादी कार्यकर्तेही त्याच मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. यावेळी दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे.  तर लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Share