बृजभुषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मनसेचे दादर पोलीस ठाण्यात निवेदन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेतर्फे आज दादर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मनसे पदाधिकारी व मनसेच्या जनहित कक्षाच्या वकिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. बृजभूषण सिंह सातत्याने राज ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करत आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वकिलांनी केली आहे.

राज्यात कुणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सांगत असतात. हनुमान चालिसाचा आग्रह करणाऱ्या व मशिदींवरील बेकायदा भोंगे बंद करण्याची मागणी करणाऱ्या शेकडो मनसैनिकांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. मग, आता बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता असतानाही महाविकास आघाडी सरकार काहीच कारवाई का करत नाही?, असा सवाल यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.

दरम्यान, आम्ही दिलेल्या तक्रार अर्जावर संपुर्ण चौकशी करून पुढील कारवाईची प्रक्रिया करू, असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. बृजभूषण हे सातत्याने राज ठाकरेंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून कार्यकर्त्यांना भडकावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेने तक्रार अर्जात केलीय.

Share